Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोकांचे पॅन, आधार वापरून जीएसटीला चुना लावणाऱ्यास अटक : जाणून घ्या सांगलीचा संबंध

लोकांचे पॅन, आधार वापरून जीएसटीला चुना लावणाऱ्यास अटक : जाणून घ्या सांगलीचा संबंधमुंबई : खरा पंचनामा

सामान्य नागरिकांच्या पॅन आणि आधार कार्डाद्वारे 119 खोट्या कंपन्या तयार करण्याऱ्या एकास राजस्थानमधील जयपूर येथून अटक करण्यात आली आहे. राज्यकर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि राज्यकर निरीक्षकांच्या विशेष पथकाने जयपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

मयुर नागपाल असे अटक केलेल्याचे नाव आहे. नागपाल बेनामी पद्धतीनं ई-मेल तयार करत असल्याचं आढळून आलं. बेनामी ई-मेल आणि खोट्या कंपन्यांशी, त्याचे थेट संबंध दिसून आले. महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या कलम 132 अन्वये हा गुन्हा ठरत असल्यानं त्यास अटक करण्यात आली. अतिरीक्त महानगर दंडाधिकारी, मुंबई यांनी त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

माही एंटरप्रायजेस या कंपनीच्या भिवंडी आणि नाशिक येथील पत्यावर छापे टाकण्यात आले. तिथे कंपनी अस्तित्वात नसल्याचं आढळून आलं. या कंपनीनं जवळपास 22 कोटींच्या इनपूट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेतल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर,  माही एंटरप्रायजेस आणि या कंपनीसोबत व्यवहार दाखवणाऱ्या कंपन्या यांच्या ई-मेल आणि मोबाईल नंबरमध्ये काही कनेक्शन सापडलं. याप्रकरणी सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. पुढील तपासासाठी अधिकाऱ्यांचं एक पथक दिल्ली आणि नोएडाला जाऊन आलं. राज्यकर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि राज्यकर निरीक्षकांच्या विशेष पथकानं आणि जयपूर पोलिसांच्या मदतीनं आरोपीला शोधून काढलं. 

जयपूरमधल्या एका बंगल्यातल्या तळघरातून आरोपी हे बेकायदेशीर काम करत असल्याचं आढळून आलं. त्याचा जबाब नोंदवण्यात आला. याप्रकारे तयार केलेल्या खोट्या कंपन्यांची संख्या पुढील तपासात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

करचुकवेगिरी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधातील राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाच्या प्रयत्नांना या कारवाईमुळे मोठं यश मिळालं आहे. अन्वेषण शाखेच्या राज्यकर निरीक्षकांनी यात मोठं योगदान दिलं आहे. आर्थिक वर्ष 2022- 23 मध्ये,राज्य वस्तू आणि सेवा कर विभागानं केलेली ही 73वी अटक आहे.

दरम्यान सांगलीतील एका व्यक्तीचे कागदपत्रे वापरून जीएसटीचा 18 कोटींचा घोटाळा करणारा अद्याप सापडलेला नाही. नागपाल याच्याकडे महाराष्ट्रातील काही लोकांची कागदपत्रे वापरून काही घोटाळे केले आहेत का याचा तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.