पोलिस दलात मोठया उलथापालथीचे संकेत : राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काहींची पदोन्नती
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या गृह विभागाकडून वरिष्ठ आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांचे आदेश सोमवारी काढण्यात आले. यामुळे भविष्यात पोलिस उपअधीक्षक, सहायक आयुक्त, निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पोलीस दलातील या बदल्यांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी देव पाण्यात घातले आहेत.
पुण्यातील अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्या जागेवर प्रवीण पाटील यांची तर, जालिंदर सुपेकर यांच्या जागेवर अरविंद चावरिया यांची बदली झाली आहे. पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे यांची पिंपरी चिंचवड येथेच पदोन्नतीने पोलिस सह आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सहआयुक्त मनोज लोहिया यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या नियुक्तीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील, असे आदेशात नमूद केले आहे.
राजेंद्र डहाळे यांची संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे येथे तर जालिंदर सुपेकर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह विभाग, पुणे येथे, प्रवीण पाटील यांची अतिरिक्त आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे येथे तर अरविंद चावरिया यांची अतिरिक्त आयुक्त, प्रशासन, पुणे या पदावर, संजय दराडे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक सीआयडी पुणे येथे बदली करण्यात आली आहे. ए. डी. कुंभारे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक एटीएस मुंबई तर एम.आर. घुर्ये यांची विशेष पोलिस निरीक्षक, रा. रा. पोलिस बल पुणे येथे आणि डी. एस. चव्हाण यांची विशेष पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर येथे, डी. आर. सावंत यांची विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
अशोक मोराळे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक, रा. रा. पोलिस बल नागपूर येथे तर एस. एच. महावरकर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड आणि निसार तांबोळी यांची विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशासन, मुंबई येथे, एस. डी. येनपुरे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक सीआयडी पुणे येथे बदली करण्यात आली आहे. के. एम. मलिकार्जुन यांची विशेष पोलिस महानिरीक्षक आस्थापना मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी अभिनव देशमुख, सारंग आव्हाड, प्रवीण पाटील, अरविंद चावरिया, अनिल पारसकर यांच्यासह दहा अधिकाऱ्यांना पोलिस उपमहानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. तर, पोलिस उपमहानिरीक्षक दीपक साकोरे यांची नवी मुंबईत अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) आणि पोलिस उप महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांची विशेष शाखा, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
अभिनव देशमुख यांची अतिरिक्त आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई, अनिल पारसकर यांची अतिरिक्त आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, एम. रामकुमार यांची अतिरिक्त आयुक्त, वाहतूक, मुंबई येथे शशिकुमार मीना यांची अतिरिक्त आयुक्त, गुन्हे, मुंबई, संजय पाटील यांची अतिरिक्त आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर येथे तर वसंत परदेशी यांची अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड, सारंग आव्हाड यांची पोलिस उपमहानिरीक्षक, सीआयडी, पुणे येथे तर पी. पी. शेवाळे यांची अतिरिक्त आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे.
गृह विभागाने अतिरिक्त पोलिस महासंचालक श्रेणीतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालकपदी बढती दिली आहे. त्यात ठाणे शहरचे पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांची पद उन्नत करून त्याच ठिकाणी नियुक्ती केली आहे. दहशतवाद विरोधी पक्षकाचे (एटीएस) मुंबईचे अतिरिक्त महासंचालक सदानंद दाते यांची एटीएसच्या पोलिस महासंचालकपदी तर, आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त महासंचालक बिपिनकुमार सिंह यांची राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नतीने बदली केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.