पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे ग्रामीणमधील सुविधांसाठी 100 कोटींचा निधी देऊ : चंद्रकांत पाटील
वेल्हे पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उदघाटन
पुणे : खरा पंचनामा
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पुणे ग्रामीण पोलीसदलाअंतर्गत वेल्हे पोलीस ठाण्याच्या दुमजली नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पोलीस दलाला सुसज्ज साधने, आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाला वाहनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येकी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व्यायामशाळेकरिता सुमारे २ लाख रुपयापेक्षा अधिकचा निधी देण्यात आला आहे.
वेल्हे येथील पोलीस ठाण्याचे बांधकाम अद्ययावत पद्धतीने करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या पोलीस स्थानकाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आणि फर्निचर करण्यासाठी रुपये ३ कोटी ३४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी म्हणाले, वेल्हे पोलीस ठाण्याची इमारत ही पर्यावरणपूरक व निसर्गाला साजेशी आहे. सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी पोलीस दल कार्यरत असून पोलीस अधिकारी व कर्मचारी पारदर्शकपणे काम करावे. आपल्या परिसरात अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन फुलारी यांनी केले.
यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी पंकज शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्यासह पोलिस तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
