माजी नगरसेविका, एपीआयच्या घराची झाडाझडती!
गडहिंग्लज उद्योजक आत्महत्या प्रकरण
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील उद्योजक संतोष शिंदे यांनी कुटुंबासह केलेल्या सामूहिक आत्महत्येनंतर गडहिंग्लज पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. संतोष शिंदे यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्रास दिलेल्या माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊत यांना मंगळवारी तपासासाठी गडहिंग्लज शहर आणि परिसरात पोलिसांनी फिरवले.
पोलिसांनी दोघांच्या घराची झाडाझडती घेतानाच त्यांच्या बँक खात्याचा तपशीलही मागवल्याचे समजते. एपीआय राहुल राऊत हा मूळचा गडहिंग्लज तालुक्यातील असून त्याचे गाव निलजी आहे. त्याच्या गावातील घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली.
पोलिसांनी माजी नगरसेविका शुभदा पाटीलच्या घराची सुद्धा झडती घेतली. शुभदा पाटीलच्या आजरा मार्गावर असलेल्या तिच्या घरात तिला नेण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घराजवळ पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान, संतोष शिंदे यांनी भयावह पद्धतीने आत्महत्या केल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राऊतला त्वरित निलंबित करावे. तसेच माजी नगरसेविका शुभदा पाटीलच्या पतीच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.