मुख्य संशयित पोलिसांच्या कव्हरेज बाहेरच!
दरोड्यात फक्त स्थानिक गुन्हेगारच सापडले : सांगली, बालिंगा, बंगाल, ओडिशा, बिहारमधील गुन्हे तपासावरच
अभिजित बसुगडे
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत रिलायन्स ज्वेल्सवर भरदिवसा दरोडा पडून 8 दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यानंतर लगेच कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील ज्वेलर्सवर गोळीबार करत दरोडा टाकण्यात आला. याशिवाय या दोन्ही दरोड्यांची मोडस ऑपरेंडी असलेल्या बंगाल, ओडिशा, बिहार येथील गुन्ह्यात फक्त स्थानिक लोकांनाच अटक करण्यात आली आहे. पण या सगळ्या दरोड्यातील मुख्य संशयित अजूनही त्या-त्या पोलिसांच्या कव्हरेजबाहेर आहेत.
सांगलीत रिलायन्स ज्वेल्सवर ज्यापद्धतीने दरोडा टाकण्यात आला त्याच पद्धतीने पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी दरोडे टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये दोन मुथुट फायनान्सची शोरूम होती तर एका ठिकाणी रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये तेथील स्थानिक पोलिसांनी काही स्थानिक संशयितांना अटक केली आहे. पण त्यापुढे त्यांचा तपास जाऊ शकला नाही.
सांगलीतील दरोड्यानंतर येथील पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांची माहिती घेतली आहे. त्यादृष्टीने आता सांगली पोलिसांचा तपास सुरू आहे. पण सांगलीतील दरोड्यात एकाही स्थानिक व्यक्तीचा सहभाग नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील ज्वेलर्सवरील दरोड्यात स्थानिक गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी स्थानिक संशयितांना अटक केली. मात्र अद्यापही त्यापुढे त्यांचा तपास जाऊ शकला नाही.
मात्र सांगली पोलिसांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली तपासात मोठी मजल मारली आहे. कोणताही सबळ, तांत्रिक पुरावे नसताना सांगली पोलिस एक पाऊल पुढे आहेत. त्यामुळे बंगाल, ओडिशा, बिहार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील दरोड्यातील स्थानिक गुन्हेगार सापडले असले तरी सांगली पोलिस मुख्य संशयितांना पकडतील असा विश्वास सांगलीकर व्यक्त करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.