रेल्वेची कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद : सांगली शहर पोलिसांची कारवाई
जयसिंगपूरसह कराडच्या 6 जणांचा समावेश
सांगली : खरा पंचनामा
सांगली येथील रेल्वे स्थानक येथून कोअर कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये जयसिंगपूरसह कराड येथील 6 जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.
किशोर भीमराव अवधूत (वय 22, रा. सैदापूर, ता. कराड), अभिषेक कृष्णा तोगे (वय 19, रा. गोवारे, ता. कराड), अनिकेत सूर्यकांत तुपे (वय 23, रा. सैदापुर, ता. कराड), विजय लक्ष्मण राठोड (वय 19, रा. आंबेडकर सोसायटी, जयसिंगपूर), अनिरुद्ध शंकर धावरे (वय 19), ओंकार रामचंद्र साळुंखे (वय19, दोघेही रा. ओगलेवाडी, कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सांगली शहरचे पोलिस निरीक्षक देशमुख यांनी चोरीच्या पार्श्वभूमीवर कडक गस्त घालण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले आहेत. त्यानुसार पहाटे कर्नाळ रस्ता परिसरात एक बोलेरो जीप (क्र. एमच 10 बीआर 3769) अडवली. गाडीची झडती घेतल्यानंतर त्यात कॉपर केबल सापडली. संशयितांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ती सांगली रेल्वे स्थानकावरून चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पवार, विनायक शिंदे, सचिन शिंदे, गौतम कांबळे, संदीप पाटील, संतोष गळवे, योगेश सदामते, योगेश सटाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.