बेडगमधील प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना!
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीचे खांब पाडल्यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. तक्रारदार आणि ग्रामस्थांची बाजू जाणून घेण्यासाठी उद्या शुक्रवारी बैठक घेण्यात येणार आहे.
कमान पाडल्याप्रकरणी बेडगच्या सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर 15 गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. गुन्हे मागे घ्यावेत, जिल्हा परिषदेने बजावलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, कमानीचे बांधकाम कोठे व कसे करायचे अथवा करायचे नाही, याबाबत मार्गदर्शन करावे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याप्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एच. काळे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे व समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांची समिती नियुक्त केली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून समितीकडून अहवाल सादर केला जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.