Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खुनी हल्ल्यातील गंभीर जखमी गुंड सच्या टारझनचा मृत्यू! संशयित तरूण ताब्यात : अनैतिक संबंधातून कृत्याची कबुली

खुनी हल्ल्यातील गंभीर जखमी गुंड सच्या टारझनचा मृत्यू!
संशयित तरूण ताब्यात : अनैतिक संबंधातून कृत्याची कबुली



सांगली : खरा पंचनामा

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड सच्या ऊफर् सचिन टारझन याच्यावर सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घरात घुसून तो झोपेत असताना त्याच्यावर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान यातील संशयित स्वतःहून कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून केल्याची त्याने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 

गणेश विनोद मोरे (वय १९, रा. अहिल्यानगर) असे संशयिताचे नाव आहे. सच्या टारझन याचे गणेश याच्या नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याचा राग गणेशला होता. सोमवारी सकाळी सच्या घरात झोपलेला असताना गणेशने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्यात तीन ते चार वर्मी घाव बसले. शिवाय हल्ल्याला विरोध करताना त्याच्या हाताची बोटेही तुटली. हल्ला केल्यानंतर गणेश तेथून निघून गेला. 

या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या सच्याला सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर गणेश स्वतःहून कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. दरम्यान गुंड सच्या टारझनचा खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुन्हेगारी क्षेत्रात मात्र या खुनाच्या कारणाबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

गुंड सच्याचा असा आहे इतिहास
सच्या टारझन सुरुवातीला रिक्षा चालवत होता. त्याच्या रिक्षावर टारझन असे लिहीले होते. त्यामुळे त्याचे नाव सच्या टारझन असे प्रचलित झाला. त्यानंतर त्याने रिक्षा संघटनेत काम सुरू केले. त्यावेळी त्याने सांगलीवाडीत एकावर हल्ला केला होता. तोच त्याचा पहिला गुन्हा ठरला. रिक्षा संघटनेत कार्यरत झाल्यानंतर त्याने दाद्या सावंत टोळीशी पंगा घेतला. २००८ मध्ये त्याने सांगली जिमखाना परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार बाळू भोकरे याच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी त्याने सावंत आणि बाबर गॅंग त्रास देत असल्यानेच हा गोळीबार केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली होती. त्यानंतर झालेल्या दाद्या सावंत याच्या खुनातही सच्याचा सहभाग होता. त्यानंतर त्याच्याकडे पाच पिस्तूल सापडली होती. याप्रकरणी सातारा जिल्ह्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या महेश नाईक खून प्रकरणात त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गेली दीड वर्षे झाली तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याची गुंड बाळू भोकरे याच्याशी सलगी वाढली होती. शिवाय या खुनातील संशयित गणेश याचे वडील विनोद मोरेही रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्याकडे सच्या टारझनने सध्या आश्रय घेतला होता. 

खुनाचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान
संशयित गणेश मोरे याने अनैतिक संबंधातून त्याचा खून केल्याची कबुली दिली असली तरी सच्याच्या खुनाचे नेमके कारण वेगळे असू शकते अशी गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे. एखाद्या गुन्हेगारी टोळीने त्याचा गेम केला असावा अशीही चर्चा आहे. त्यामुळे सच्याच्या खुनाचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.