पंचगंगा नदी इशारा पातळीकडे!
कोल्हापूर : खरा पंचनामा
शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे जिल्ह्यातील ६९ बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. नदीतील पाण्याची वाढ इशारा पातळीकडे होत आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३९ फुटावर गेल्यानंतर नदी इशारा पातळीवर पोहोचते. सायंकाळी चार वाजता येथील पाणी ३३ फुटावर राहिले.
पाणी पातळी वेगाने वाढत असल्याने पूरबाधीत परिसरातील लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे राधानगरी धरणातून १,२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
बुधवारी रात्रीपासून पावसाने थोडी उसंत घेतली.
गुरुवारी दुपारपर्यंतही चांगली उघडीप होती; परंतु, दुपारनंतर मात्र दिवसभर चांगल्या सरी कोसळल्या. त्यामुळे धरण, नदीतील पाणी पातळीत वाढ गतीने होत आहे. पंचगंगा नदीतील पाणी बुधवारी रात्रीच पात्राबाहेर पडले.
भोगावती, कासारी, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा, कुंभी, वारणा, कडवी, धामणी, तुळशी नदीतील पाणी पात्राबाहेर पडले आहे. परिणामी, सर्वच नद्यांतील ६९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधारे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.