Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बापाने घेतलेल्या 'कट्ट्या'ने घेतला चिमुकल्याचा बळी!

बापाने घेतलेल्या 'कट्ट्या'ने घेतला चिमुकल्याचा बळी! 



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

गंगापूर शहरात खासगी बँकेत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या एकाने अवैधरित्या गावठी कट्टा विकत घेतला. पण विकत घेतलेला कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली आणि त्याच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 48 तासात त्याची मृत्यूशी झुंज संपली. रविवारी (27 ऑगस्ट) सकाळी 7 वाजता या चिमुकल्याचा मृत्यू झाला. 

आर्यन राहुल राठोड (वय 2 वर्षे), असे मृत चिमुकल्याचे नाव असून, राहुल कल्याण राठोड (वय 29 वर्ष) असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर येथे राहुल कल्याण राठोड पत्नी संगीता आणि अडीच वर्षांच्या मुलासह राहतो. राहुल हा कर्ज वितरण करणाऱ्या एका बँकेत वसुलीचे काम करतो. दरम्यान, आपल्या कामात वसुलीचे करण्याची गरज पडते म्हणून त्याने एक गावठी कट्टा विकत घेतला. 25 ऑगस्ट रोजी तो गावठी कट्टा आपल्या घरी घेऊन आला. पण हा गावठी कट्टा नेमका चालवायचा कसा याबाबत राहुलला कोणतीही माहिती नव्हती. 

दरम्यान, घरी आल्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास आपण आणलेला गावठी कट्टा तो आपल्या पत्नीला दाखवत होता. पण याचवेळी कट्ट्यातून गोळी सुटली आणि त्यांच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली. घरात झालेल्या गोळीबारात मुलगा आर्यन राठोड गंभीर जखमी झाला होता. आर्यनच्या कपाळात मधोमध गोळी लागली होती. तेव्हापासून तो अत्यवस्थ होता. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र रविवारी उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.