सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गावठी पिस्तूल जप्त
एक लाखांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक काडतूस, मोपेड असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी मध्यरात्री विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
वैभव राजाराम आवळे (वय २५, रा. हडको कॉलनी, मिरज), अमोल अशोक घोरपडे (वय ३४, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्रामबागचे पोलिस निरीक्षक श्री. मोरे यांनी घातक शस्त्रे, पिस्तूल, कट्टे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री अकरा वाजल्यापासून पोलिसांचे पथक विश्रामबाग परिसरात गस्त घालत होते. तर स्फूर्ती चौक तसेच परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.
मध्यरात्री दोघेही संशयित एका मोपेडवरून स्फूर्ती चौक परिसरात आले. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल, एक काडतूस असा मुद्देमाल सापडला. दोघांनाही तातडीने अटक करण्यात आली. त्यांच्याकडील मोपेडही जप्त करण्यात आली आहे. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मारामारी, घरफोडी, चोरी, घातक शस्त्रे बाळगणे, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वैभव आवळे याला सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अफरोज पठाण, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, सोहेल मुल्ला आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.