Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईत मराठा समाजाचं गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत आंदोलन

मुंबईत मराठा समाजाचं गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत आंदोलन



मुंबई : खरा पंचनामा

मुंबईत मराठा समाजातील बांधवांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा मोर्चा काढला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मोर्चाला सुरुवात झाली आहे. मराठा बांधवांचा मोर्चा निघणार हा व्हायरल मेसेज पोलिसांपर्यंत पोहचला होता.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला. आता हाच व्हायरल मेसेज खरा ठरला असून मराठा आंदोलक मोर्चासाठी गिरगाव चौपाटीवर एकत्र आलेत. गिरगाव चौपाटीपासून मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं कूच करत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र तर्फे आज मुंबईत धडक मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चानं थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं कूच केली आहे. मोर्चा गिरगाव चौपाटीहून निघाला असून तो वर्षा बंगल्यावर जाणार आहे. त्यादरम्यानच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आरक्षण हे मराठा म्हणूनच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे, कायद्यात टिकणारं पाहिजे या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. हा मोर्चा गिरगाव चौपटी शहिद तुकाराम ओंबळे स्मारकापासून सुरू झाला असून थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यापर्यंत जाणार आहे. पण, या आंदोलनामुळे मराठा समाजात दोन मतं तर निर्माण झाली नाहीत ना? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

कारण काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी जालना येथे आमरण उपोषण केलं होतं. मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्या, यासह इतर मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. पण आता मराठा क्रांती मोर्चानं मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशा मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.