अपहरण करून वृद्ध महिलेला लुटणाऱ्या दोघांना अटक
दागिन्यांसह लाखाचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर बस स्थानकात कामेरीला जाणाऱ्या बसची वाट पाहणाऱ्या वृद्ध महिलेला दुचाकीवरून सोडण्याचा बहाणा करून तिचे अपहरण करून तिला लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटलेले दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
किरण दत्तात्रय चव्हाण (वय २४, रा. चिखली, ता. शिराळा), गोरखनाथ रघुनाथ कांबळे (वय २२, रा. बावधन, ता. वाई, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रविवार दि. ५ रोजी दुपारी हिराबाई घेवदे कामेरीला जाण्यासाठी इस्लामपूर बसस्थानकात बसची वाट पहात थांबल्या होत्या. त्यावेळी संशयित तेथे गेले. त्यांनी कामेरीला सोडतो असे सांगून दुचाकीवरून नेले. रस्त्यात निर्जन ठिकाणी थांबून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने घेऊन संशयित पसार झाले होते. याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तातडीने करण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते.
या गुन्ह्याचा तपास करताना पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यावेळी महिलेला लुटणारे संशयित चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी पेठ नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला. एका दुचाकीवरून (एमएच ०९ एफवाय २३९२) दोघेजण तेथे आले. पथकाला त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्या खिशात सोन्याचे दागिने सापडले. त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी महिलेला लुटल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून दागिने, दुचाकी जप्त करण्यात आली. दोघांनाही इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर इस्लामपूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली, वडगाव पोलिस ठाण्यात चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक रोहिदास पवार, अरूण पाटील, प्रकाश पाटील, सूरज थोरात, सुनील जाधव, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.