Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आम्ही फक्त तुमच्या जाहिरातींचे चेहरे! विनेश फोगटचे पंतप्रधानांना पत्र, खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार

आम्ही फक्त तुमच्या जाहिरातींचे चेहरे! 
विनेश फोगटचे पंतप्रधानांना पत्र, खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणारनवी दिल्ली : खरा पंचनामा

लैंगिक शोषणाच्या आरोपात बरबटलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी आणि महिला पैलवानांना न्याय मिळावा यासाठी खेळाडूंनी आपले पुरस्कार आणि सन्मान परत करण्यास सुरुवात केली आहे.

बजरंग पूनिया आणि वीरेंद्र सिंह यांच्यानंतर आता विनेश फोगट हिनेही आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आम्ही खेळाडू फक्त तुमच्या बेटी बचाओच्या जाहिरातीत छापण्यासाठीचे चेहरे झालो आहोत, असं विनेश आपल्या पत्रात म्हणाली आहे.

बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे 'डब्लूएफआय'चे नवे अध्यक्ष झाल्यानंतर ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकने अश्रू अन् हुंदके आवरत तडकाफडकी कुस्तीला रामराम ठोकण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. त्यानंतर बजरंग पूनिया यानेही आपल्या पद्मश्री हा सन्मान परत केला. आता या यादीत खुद्द विनेश फोगट हिचंही नाव आलं आहे. तिने पत्र लिहून आपण आपला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करणार असल्याचं म्हटलं आहे.

जेव्हा साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक जिंकलं तेव्हा तुम्ही तिला बेटी बचाओचं ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं होतं. आता जेव्हा साक्षीने कुस्तीला रामराम केला तेव्हा मला एकच जाणीव होतेय की आम्ही पैलवान फक्त तुमच्या जाहिरातीतले चेहरे बनून राहिलो आहोत. पण आमचं आयुष्य त्या जाहिरातीसारखं अजिबातच नाही. महिला पैलवानांनी गेल्या काही काळात जे काही भोगलं आहे, त्याने त्यांची घुसमट स्पष्ट कळत आहे. आमच्या पदकांना, मेहनतीला आता काहीही किंमत राहिली नाही. तरीही आमच्यासाठी ती जिवाहून प्रिय आहेत. आता ही परिस्थिती पाहता मला तुमच्या जाहिरातीत तयार झालेल्या प्रतिमेतून मुक्तता हवी आहे. त्यामुळे ही पदकं मी परत करतेय. जेणेकरून आमच्या जीवनातील पुढील वाटेवर ती ओझं बनून राहू नयेत, असं विनेशने स्पष्ट केलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.