Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विटा पालिकेचा मिळकत व्यवस्थापक २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विटा पालिकेचा मिळकत व्यवस्थापक २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

विटा नगरपालिकेतून निवृत्त झालेल्याकडून देय रकमेचा धनादेश काढण्यासाठी त्याच्याकडून २५ हजारांची लाच घेताना मिळकत व्यवस्थापकाला रंगेहात पकडण्यात आले. बुधवारी दुपारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

पुंडलिक हिरामण चव्हाण (वय ४९, रा. साळशिंगी रोड, विटा, मूळ रा. मोहनदरे, जि. नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुंडलिक चव्हाण हा विटा नगरपालिकेत मिळकत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार व्यक्तीचे वडील विटा पालिकेत कार्यरत होते. ते आता निवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवा कालावधीत मिळणाऱ्या शासकीय देय रकमेचा धनादेश काढण्यासाठी चव्हाण याने त्यांच्याकडे २५ हजार रूपये लाचेची मागणी केली.  

मात्र तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत दि. २० डिसेंबर रोजी चव्हाण याच्याविरोधात सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. विभागाने याची पडताळणी केल्यानंतर चव्हाण याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच घेताना चव्हाण याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात विटा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शासकीय, निमशासकीय लोकसेवकांनी लाच मागितल्यास 9821880737 या मोबाईल क्रमांकावर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपअधीक्षक पाटील यांनी केले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, ऋषिकेश बडणीकर, उमेश जाधव, सुदशर्न पाटील, सिमा माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.