Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा समाजाच्या सर्वेसाठी शिक्षकांची नियुक्ती करावी : विलासराव देसाई अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मराठा समाजाच्या सर्वेसाठी शिक्षकांची नियुक्ती करावी : विलासराव देसाई
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



सांगली : खरा पंचनामा

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सध्या शासकीय कर्यालयातील चतुर्थ श्रेणी तसेच अशिक्षित लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनातर्फे सध्या मराठा समाजाचा सर्वे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र अशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे हा सर्वे व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सर्वे करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलासराव देसाई यांनी शिष्टमंडळाद्वारे सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने (मागासवर्ग आयोग) सुचित केल्यानुसार मराठा समाजाच्या सर्वेसाठी नेमलेले कर्मचारी अशिक्षित, अप्रशिक्षित तसेच मोबाईलचे ज्ञान नसलेले दिसून येत आहे. अशा कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या सर्वेतुन मराठा समाजाला न्याय मिळणार नाही. शासनाच्या विविध विभागातून सर्वे करण्यासाठी नेमलेले कर्मचारी संबंधित विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याचेही दिसून येत आहे. त्यांना मोबाईलचे आवश्यक ते ज्ञान नसल्याने ते सोबत काही लोकांना घेऊन सर्वे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश कर्मचारी संबंधित कुटुंब प्रमुखाचा केवळ आधार कार्ड क्रमांक घेऊन तुमचा सर्वे झाला असे सांगत आहेत. दिलेल्या ऍपमध्ये मोबाईल आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर प्रश्नावली आली तरच ते प्रश्न विचारतात प्रश्नावली आली नाही तरी सर्वे झाला असे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे. 

संबंधित कर्मचारी अशिक्षित असल्याने मराठा समाजाला बिनधास्तपणे खोटी माहिती देत आहेत. शासनाने दिलेल्या परिपत्रकात १५४ प्रश्न आहेत तर उपप्रश्न धरून एकूण १९५ प्रश्न आहेत. हे प्रश्न विचारूनच त्याची उत्तरे मराठा कुटुंबाकडून घेतल्यानंतरच सर्वे व्यवस्थित होणार आहे. मात्र सध्या नेमलेले कर्मचारी हे प्रश्न विचारत नसल्याचा अनुभव आला आहे. त्यामुळे मराठा समाज मागास आहे की नाही हे ठरण्यात अडचण येणार आहे. त्यामुळे हा सर्वे व्यवस्थित होणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्वेसाठी शिक्षित अशा शिक्षकांचीच नेमणूक करावी अशी आमची आग्रही मागणी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याची तात्काळ दखल घेऊन अंमलबजावणी करावी तसेच सर्वेसाठी मुदतवाढ द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. 

अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलासराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली अमरसिंह पाटील, अमोल शिंदे, तानाजी भोसले, प्रदीप कोडग, विजय धुमाळ, दादासो पाटील, संतोष माने, संतोष चव्हाण, अक्षय मिसाळ, मयूर दाणेकर आदींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.