Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्त्याचा कुरूंदवाडमध्ये खून! नांदणी रस्त्यावर कारमध्ये सापडला मृतदेह, सांगलीत खळबळ

सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्त्याचा कुरूंदवाडमध्ये खून!
नांदणी रस्त्यावर कारमध्ये सापडला मृतदेह, सांगलीत खळबळसांगली ः खरा पंचनामा

सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता असलेल्या तरूणाचा शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड येथे निर्घ्रुणपणे खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. कुरूंदवाड-नांदणी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका मारूती स्विफ्ट कारमध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती मिळताच कुरूंदवाड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सांगलीतील माहिती अधिकार  कार्यकर्ता असणाऱ्या तरूणाचा खून झाल्यामुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.  त्याचा खून कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


संतोष विष्णू कदम (वय ३७, रा. गावभाग, सांगली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. कुरूंदवाड-नांदणी रस्त्यावरील एका शेतालगत एक मारूती स्विफ्ट कार (एमएच ०९ बीबी ८०६) उभी केली होती. सुरुवातीला येणाऱ्या-जाणाऱ्यांनी या गाडीकडे दुर्लक्ष केले. दुपारी बाराच्या सुमारास खूपच वेळ गाडी उभी असल्याने परिसरातील काही शेतकऱ्यांनी गाडीत डोकावल्यानंतर एक तरूण रक्तबंबाळ अवस्थेत पुढील बाजूस बसल्याचे दिसून आले. त्यानंतर याची माहिती कुरूंदवाड पोलिसांना देण्यात आली.

कुरूंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी तो तरूण मृत झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याजवळील कागदपत्रांवरून तो संतोष कदमचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वान पथकालाही पाचारण केले. सांगलीतील तरूणाचा कुरूंदवाड येथे खून झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाला गती दिली असून कदम याच्या मारेकऱ्यांसह खुनाच्या कारणाचाही शोध पोलिस घेत आहेत.

संतोष कदम हा माहिती अधिकार कार्यकर्ता होता. सांगलीतील महापालिका तसेच अन्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात त्याने माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात खंडणीसह विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता. काही राजकीय नेत्यांशीही त्याने पंगा घेतला होता. संतोष कदम याच्या खुनाशी सांगलीतील कोणाचा संबंध आहे का यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. दरम्यान संतोष बेपत्ता असल्याची नोंद सांगली शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.