Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमेवर अधिक मनुष्यबळ ठेवावे सांगलीत महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त बॉर्डर मीटींगमधील निर्णय

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमेवर अधिक मनुष्यबळ ठेवावे
सांगलीत महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त बॉर्डर मीटींगमधील निर्णयसांगली ः खरा पंचनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी दोन्ही राज्यांच्या सीमेवरील पोलिसांनी तपासणी नाक्यावर अधिक मनुष्यबळ ठेवावे. तसेच दोन्ही राज्यातील सराईत, फरारी, पाहिजे असलेले गुन्हेगार यांची माहिती एकमेकांना द्यावी. शिवाय सीमेवरून दारू, अंमली पदार्थ, पैसे यांची वाहतूक रोखण्याची खबरदारी घ्यावी असा निणर्य महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, विजयपूरचे पोलिस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमेवरील पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बॉर्डर मीटींग घेण्यात आली. त्यावेळी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या आधीपासूनच घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.  

सांगली आणि विजयपूर जिल्ह्यातील एकमेकांच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी, फरारी, कारागृहातून बाहेर आलेले यांच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यात आले. पकड वारंटमधील आरोपींचा शोध घेण्याबाबत संयुक्तपणे शोध घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यातील सीमेवरील अधिकाऱ्यांनी कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. 

या बैठकीस जतचे पोलिस उपअधीक्षक सुनिल साळुंखे, विजयपूरचे पोलिस उपअधीक्षक गिरीमल्ला तलकट्टी, विजयपूरचे ग्रामीणचे सीपीआय आनंदराव, सांगली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, डीएसबीचे निरीक्षक संतोष डोके, जतचे निरीक्षक सूरज बिजली, कवठेमहांकाळचे निरीक्षक संदीप कोळेकर, उमदीचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.