Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लढणार

भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लढणारनवी दिल्ली : खरा पंचनामा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपच्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवारांचं नाव घोषित करण्यात आलं नाहीय.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची घोषणा करताना, पत्रकार परिषदेत म्हटलं की, "प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून काही नावं आमच्याकडे आली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत तिथल्या स्थानिक नेतृत्वाने चर्चा केली."

29 फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 195 जणांची पहिली यादी निश्चित करण्यात आल्याचं विनोद तावडेंनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडूणक लढतील, अशी माहिती तावडेंनी दिली. तसंच, या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांची नावं या यादीत आहेत. लोकसभा अध्यक्षांचं नावही या यादीत आहे, असं विनोद तावडेंनी सांगितलं.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने सेवा, सुशासन, गरीब कल्याण तसंच सबक साथ, सबका विकास यांचं उदाहरण गेल्या दशकभरात जगभरात प्रस्थापित केलं आहे.

"अनेक महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाले. यावेळी एनडीए चारसौ पारचं उद्दिष्ट घेऊन पुढे जाण्याचं लक्ष्य पंतप्रधानांनी समोर ठेवलं आहे. जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने गेल्या दोन वेळेपेक्षाही प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल हा विश्वास आम्हाला आहे."

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत. मध्य प्रदेशमधील गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे.

राजस्थानच्या बिकानेरमधून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांना उमेदवारी दिली गेली आहे, तर कोटा इथून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मथुरेच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

लखीमपूर खिरीमधून अजय मिश्रा टेनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उन्नावमधून साक्षी महाराज यांना उमेदवारी देण्यात आलीय, तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनौमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही पुन्हा एकदा अमेठीतून संधी दिली गेलीये.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.