शरद पवार यांनी दिलेल्या जेवणाच्या आमंत्रणाला उपमुख्यमंत्री फडणवीसांचा नकार
पुणे : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील घरी जेवणाचं आमंत्रण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलं होतं. मात्र, त्यांचं हे आमंत्रण भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारले. त्याबाबत पत्र जारी करत तसं कारणही दिलं.
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या परिसरात राज्य सरकारच्या वतीनं 'नमो महारोजगार मेळाव्या'चं शनिवारी (दि.2) आयोजन करण्यात आलं आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. पवारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना स्वतः फोन करून तशी विनंतीही केली होती.
मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आमंत्रण नाकारलं आहे. पवारांच्या आमंत्रणाला नकार देण्यामागचं कारणही फडणवीसांनी सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपण कामात व्यस्त असल्याने यावेळी तरी येणे शक्य होणार नसल्याचे म्हटले आहे.
काय म्हटलंय पत्रात?
'आपण जाणताच की, अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती इथं नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि त्यानंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्यानं उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यग्रतेचा असणार आहे. त्यामुळं आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.