Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पहिला उमेदवार ठरला सुळेंनी केली स्वतःच्या उमेदवारीची घोषणा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पहिला उमेदवार ठरला
सुळेंनी केली स्वतःच्या उमेदवारीची घोषणापुणे : खरा पंचनामा

लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच भाजपनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

ज्यामध्ये 195 उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या सहा आणि सात तारखेला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वीच मोठी बातमी समोर आली आहे.

जागा वाटप होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार ठरला आहे. सुप्रिया सुळे यांनी आपण बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत याबाबत घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर बारामती लोकसभेचं रणशिंग फुंकलं आहे. आपण बारामती लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबरोबरच गेल्या पाच वर्षांमध्ये बारामतीत काय काय विकास कामं झाली? याचा लेखाजोखा मांडतानाच त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन देखील केलं आहे.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दोनच दिवसांपूर्वी बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला बारामतीच्या खासादर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभा उमेदवारीबाबत घोषणा करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.