Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एक-एक पेगचा हिशेब द्या! उत्पादन शुल्क विभागाचे बारचालकांना आदेश

एक-एक पेगचा हिशेब द्या! 
उत्पादन शुल्क विभागाचे बारचालकांना आदेश



मुंबई : खरा पंचनामा

ग्राहकाला दिलेल्या बिलात विक्री केलेल्या मद्याच्या ब्रँडचे नाव, पेगची संख्या, किंमत याचा तपशील नोंदविण्याचा आदेश सर्व परमीट रूम, हॉटेल, क्लब आणि बारचालकांना दिला आहेत. तसेच ग्राहकांनी आपले बिल नीट तपासून घ्यावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

राज्य शासनाला मद्य निर्मिती आणि विक्रीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, राज्यातील परमीट रूम, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये महागड्या आणि उच्च प्रतीच्या मद्यात भेसळ सुरू असल्याच्या असंख्य तक्रारी विभागाकडे आल्या आहेत. महागड्या मद्याच्या बाटलीत हलक्या प्रतीचे मद्य भेसळ करून त्याची विक्री होत असल्यामुळे शासकीय महसूल बुडत आहे. याशिवाय ग्राहकांचीही फसवणूक होत आहे. याला आळा घालण्यासाठी ग्राहकाला दिलेल्या बिलावर विक्री केलेल्या ब्रँडचे नाव, पेगची संख्या व त्याची किंमत नमूद करण्याचे आदेश दिले आहेत.

यावर पाळत ठेवण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच 'एफएल-३' अनुज्ञप्तीचे निरीक्षण करतेवेळी मद्य विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या देयक (बिल) प्रतीची पडताळणी करावी. त्यात तफावत आढळल्यास कारवाई करण्याचे आदेशही विभागाने दिले आहेत.

ग्राहकांनी महागडे ब्रँडचे मद्य खरेदी करताना बारचालकांनी दिलेले बिल तपासून घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे. बँडचे नाव आणि पेगची संख्या या बिलात समाविष्ट नसल्यास विभागाकडे थेट तक्रारी करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींना केले आहे.

बिलाच्या तपशिलासंदर्भातील आदेशाचे काटेकोर पालन न केल्यास कार्यक्षेत्रीय अधिकारी तसेच निरीक्षकांना जबाबदार धरण्यात येईल. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, निरीक्षकांनी परमीट रूम, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये जाऊन तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.