Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्राचं पाणी कर्नाटकनं चोरलं! राजापुर बंधारा परिसरात कुरुंदवाड पोलिसांचा 'खडा पहारा'

महाराष्ट्राचं पाणी कर्नाटकनं चोरलं!
राजापुर बंधारा परिसरात कुरुंदवाड पोलिसांचा 'खडा पहारा'कुरुंदवाड : खरा पंचनामा

कर्नाटकमध्ये पाण्याची चणचण भासत असल्याने पाण्यासाठी वणवण सुरू आहे. कर्नाटक मधील काही गावांनी महाराष्ट्रातील हद्दीतील नद्यांचे बर्गे काढून पाणी घेण्यास सुरुवात केली असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान कुरुंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आज बंधारा परिसरात पाहणी केली.

कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पुरेसा पाणीसाठा असला तरी जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केले जात आहे. त्यामुळे सोलापूरच्या जिल्ह्याच्या शेवटच्या गावापर्यंत कोल्हापुरातील धरणातील पाणी पोहोचण्यासाठी पाटबंधारे विभाग विशेष मेहनत घेत आहे. तसेच बंधाऱ्यावर बर्गे टाकून शेतकऱ्यांना मुबलक पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र, कर्नाटकडून पाणीचोरी होत असल्याने डोकेदुखी वाढणार आहे.

कोल्हापुरमधील राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर राजापूर येथे कृष्णा नदीवर असलेल्या शेवटच्या बंधाऱ्यावर बंदोबस्त ठेवून पाण्यावर नजर ठेवण्यात येत आहे. राजापूर बंधाऱ्याच्या पुढे, कर्नाटक राज्यात पाणीटंचाई असल्याने अज्ञातांनी बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. त्यामुळे नदीपात्रातून विसर्ग कर्नाटकला सुरू होता. आज्ञातांनी हा प्रकार केल्यानंतर ग्रामस्थांनी त्याची माहिती प्रशासनाला दिली.

शासनाची कोणतीही परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि कर्नाटकमध्ये वाद होऊ नये यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या वतीने राजापूर बंधाऱ्यावर दोन पोलिस आणि दोन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अशा चार कर्मचाऱ्यांचे दोन शिफ्टमध्ये पथक नियुक्त करण्यात आले आहे. 24 तास राजापूर बंधाऱ्यावर आता पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त राहणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.