Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजप पक्षामध्ये जावं असं काही सहकाऱ्यांचं म्हणणं..

भाजप पक्षामध्ये जावं असं काही सहकाऱ्यांचं म्हणणं..मुंबई : खरा पंचनामा

अजित पवार हे भाजपसोबत गेले. त्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. या शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी तर याआधीही शरद पवारांनी भाजपसोबत बोलणी केली होती, असा दावा केला.

शरद पवार भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा करत होते. मात्र ऐनवेळी त्यांनी आपला निर्णय बदलला, असं विधान तर खुद्द अजित पवारांनी देखील केलं आहे. त्यामुळे खरंच भाजप सोबत जाण्यासाठी शरद पवार सकारात्म होते का? त्यांची भूमिका नेमकी काय होती? या सगळ्यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखती दरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं काय होतं? आणि त्यांची भूमिका काय आहे? यावर भाष्य केलंय.

2004, 2014, 2017, 2019 यावेळी शरद पवारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी चर्चा केली, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करतात. त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं. आमच्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांचं हे मत होतं की आपण भाजपसोबत जावं. दोन पद्धतीने त्यांच्यासोबत जाण्याबद्दल बोलत होते. एक त्यांच्याबरोबर सत्तेत जावं आणि दुसरं म्हणजे भाजप पक्षात जावं असं काही सहकाऱ्यांचं म्हणणं होतं, असं शरद पवारांनी सांगितलं.

2004 मध्ये प्रफुल्ल पटेल यांचा आग्रह होता की, आपण भाजपसोबत जावं. त्यावेळी इंडिया शायनिंगची घोषणा झाली होती. अटलबिहारी वाजपेयींसारखा नेता दुसरं कुणाला स्विकारणार नाही. आपण त्यांच्याबरोबर जावं. त्यांच्या आघाडीत आपण सहभागी व्हावं. पण मी ते स्विकार नाही केलं, असं शरद पवार म्हणाले.

प्रफुल्ल पटेल आणि माझ्या विचारांमध्ये अंतर होतं. पण त्यांनी माझ्या विचारांचा आदर ठेवला. सुदैवाने आमचं सरकार सत्तेत आलं. प्रफुल्ल पटेल हे दहा वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात राहिले. ही वस्तुस्थिती आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.

आता जे आमदार निवडून आले त्यातील बऱ्याच आमदारांचं म्हणणं होतं की आपण भाजपसोबत जावं. त्यामुळे मी म्हटलं की तुम्हाला चर्चा करायची असेल तर करा. काय प्रस्ताव असेल तो सांगा. पण त्यांचा प्रस्ताव आला तो पटणारा नव्हता. पण मी म्हटलं ज्यांना जायचं असेल त्यांना स्वातंत्र्य आहे. पण मी येणार नाही. नंतर आता एका ठराविक वेळेनंतर काही लोकांनी तो निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.