सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची मध्यरात्री आत्महत्या
मुंबई : खरा पंचनामा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने काल मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्रकाश गोविंदा कापडे (वय 37) असे आत्महत्या करणाऱ्या बॉडीगार्डचे नाव आहे. जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगरमध्ये ते वास्तव्यास होते.
प्रकाश कापडे हे SRPF मध्ये भरती झाले होते. त्यानंतर त्यांची पोस्टिंग होऊन ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे बॉडीगार्ड म्हणून कर्तव्यावर होते. आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. यावेळी घरातील सर्व झोपले होते. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घरातील लोक धावत आले तेव्हा प्रकाश हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर प्रकाश कापडे यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला मात्र त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपासात याचे कारण स्पष्ट होईल. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.