आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जमावाचा पोलिस ठाण्यावर हल्ला, दोन पोलिस गंभीर
जामनेर : खरा पंचनामा
एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून करुन पसार झालेल्या सुभाष उमाजी भील (३५) या आरोपीला पकडण्यात आले. त्याला आमच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी जमलेल्या जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला.
जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव शांत होत नव्हता. जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या. तसेच संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली तसेच अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे काही वेळातच जामनेरात दाखल झाले. जमावाला आवर घालण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरले.
जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यापैकी रामदास कुंभार, रमेश कुमावत गंभीर जखमी आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.