दीड तास वाट पाहून शरद पवारांनी आत घेतलं पण अवघ्या 15 मिनिटांत भुजबळ बाहेर पडले!
मुंबई : खरा पंचनामा
अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सोमवारी सकाळी अचानकपणे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. शरद पवार यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे छगन भुजबळ यांना त्यांच्या भेटीसाठी तब्बल दीड तास वाट पाहावी लागली.
पण छगन भुजबळ हे पवारांची भेट घेतल्याशिवाय माघारी जायचे नाही, या पवित्र्यात होते. अखेर दीड तासाभरानंतर शरद पवार यांनी भुजबळ यांना आतमध्ये बोलावले. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत या दोन्ही नेत्यांची चर्चा आटोपली. माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, त्यासाठी मला निघायचे आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या कारणासाठी इथे आला आहात, असे शरद पवार यांनी भुजबळ यांना विचारल्याचे समजते. यावर छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
काहीवेळापूर्वीच शरद पवार यांची भेट आटोपून छगन भुजबळ सिल्व्हर ओकवरुन माघारी परतले आहेत. सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडताना छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी काहीच बोलले नाहीत. आता ते आणखी काही वेळाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधून या भेटीविषयी नेमकं काय सांगणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.