घरफोडी करणाऱ्या तरूणाला अटक
१.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
येथील एक स्टूडियो फोडून ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून महागडा कॅमेरा, त्याची लेन्स असा १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
गोविंदा भिमाप्पा बंडीवडर (वय २१, रा. पत्रकारनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बुधगाव येथील तनिष घाईल यांच्या सांगली येथील स्टूडियोमधून महागडा कॅमेरा आणि त्याची लेन्स चोरीला गेली होती. याबाबत त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिल्या होत्या. निरीक्षक मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पथक चोरट्यांचा शोध घेत असताना शहरातील शिवशंभो चौकात एक तरूण कॅमेरा आणि त्याची लेन्स विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने परिसरात सापळा रचून बंडीवडर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केल्यावर त्यामध्ये कॅमेरा आणि त्याची लेन्स सापडली. त्याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर त्याने खनभाग येथील स्टूडियो फोडून तेथून तो चोरल्याची कबुली दिली. मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, वरीष्ठ निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.