आता घरबसल्या करा पोलिसांत ई-तक्रार; ३ दिवसांनी पोलिस ठाण्यात जाणे गरजेचे
मुंबई : खरा पंचनामा
नवीन फौजदारी कायद्यांमुळे आता नागरिकांना देशभरात कुठूनही ई-तक्रार करता येणार आहे. ई- तक्रारीवरून पोलिस प्राथमिक तपास सुरू करून पुरावे जमा करतील. मात्र, त्यानंतर तीन दिवसात पीडित, तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करणे आवश्यक आहे.
त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे महाराष्ट्र पोलिस अकादमीचे उपसंचालक काकासाहेब डोळे यांनी प्रेस इन्फॉर्मशेशन ब्युरोने (पीआयबी) आयोजित केलेल्या कार्यशाळेदरम्यान सांगितले.
सोमवारपासून भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. त्यातील तरतुदींनुसार पोलिस ठाण्यांना सर्व प्रक्रियेचे ऑडिओ व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे लागेल.
नवीन कायद्यांच्या सविस्तर माहितीसाठी गुरुवारी पीआयबी, मुंबईने पत्रकारांसाठी कार्यशाळा घेतली. यावेळी, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे उपसंचालक काकासाहेब डोळे आणि उच्च न्यायालयाचे अॅड. अभिनित पांगे यांनी गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पीआयबी मुंबईच्या अतिरिक्त संचालक स्मिता शर्मा उपस्थित होत्या. डोळे म्हणाले, "पूर्वीचा कायदा हा आरोपी केंद्रित होता, मात्र नवीन कायदा न्यायकेंद्रित आहे. या बदलांनुसार आता छायाचित्रण, सीसीटीव्ही चित्रण, छायाचित्र, रेकॉर्ड केलेले संभाषण, फोन रेकॉर्ड, लोकेशन आदी तांत्रिक पुराव्यांना अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा जबाब, त्या आधारे नोंद होणारे दखलपात्र गुन्हे, पुरावे गोळा करताना बंधनकारक असलेले पंचनामे, साक्षीदार आणि आरोपींचे जबाब, शोधमोहीम, झडती, जप्ती, अटक आदी सर्व प्रक्रिया ऑन कॅमेरा घेण्याची तरतूद या कायद्यात आहे.
झिरो एफआयआरद्वारे नागरिक कुठूनही आपली तक्रार नोंदवू शकतात. पुढे, तो गुन्हा संबंधित पोलिस ठाण्यात तपासासाठी वर्ग होईल. याशिवाय ई-तक्रार करण्याची सुविधा या कायद्यांतर्गत आहे. ई-तक्रारीवरुन पोलिस प्राथमिक तपास सुरू करून पुरावे जमवतील. मात्र पुढील तीन दिवसात पीडित, तक्रारदार याला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करणे आवश्यक आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. अनेकदा गुन्हा घडल्यानंतर तत्काळ हजर होणे शक्य नसल्याने तक्रारदारांना फायदा होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.