वरिष्ठांना मर्जीतील पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना बदली किंवा बढतीच्या ठिकाणी...
मुंबई : खरा पंचनामा
आपल्या मर्जीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बदली किंवा बढतीच्या ठिकाणी स्वतः बरोबर घेऊन जाण्याची प्रथा पोलिस खात्यात रूजली होती. या प्रथेला पोलिस महासंचालक आणि अप्पर पोलिस महासंचालक यांनी ब्रेक लावला आहे. त्यामुळे आपल्या विश्वासू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बदली किंवा बढतीच्या ठिकाणी वरिष्ठांना नेता येणार नाही.
यासंदर्भात पोलिस मुख्यालयानं गुरूवारी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या मर्जीतील अधिकारी वा अंमलदारांना स्वतःकडे थांबविता येणार नाही. या प्रकारच्या अधिकारी आणि अंमलदारांना मूळ ठिकाणी पाठविण्यासाठी पाच दिवसांची मूदत आयुक्त आणि अधिकक्षांना देण्यात आली आहे. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि अप्पर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांच्या मान्यतेने हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
पोलिस आयुक्तांपासून उपायुक्तांपर्यंत अनेक अधिकारी बदली किंवा बढती होताच विश्वासू अधिकारी आणि अंमलदारांची फौज स्वतः बरोबर नेतात. यात कार्यालय आणि पद बदलले तरी त्यांच्या हाताखालील कर्मचारी तेच असतात. मात्र, पोलिस महासंचालक आणि अप्पर पोलिस महासंचालकांच्या आदेशामुळे या प्रथेला 'फूलस्टॉप' लगावला आहे.
पोलिस आयुक्त, अधीक्षक आणि परिक्षेत्रीय अधिकारी विविध कारणांवरून अधिकारी आणि अंलदारांना बदली ठिकाणाहून अन्यत्र संलग्न करत असल्याचं पोलिस मुख्यालयाच्या निदर्शनास आलं. पण, या प्रक्रियेस कायदेशीर, प्रसासकीय मान्यता नाही. त्यामुळे, यापुढे बदली झालेल्या अधिकारी आणि अंमलदारांना कोणत्याही कारणास्तव संलग्न करण्यात येऊ नये.
वरिष्ठांशी संलग्न असलेल्या अधिकारी आणि अंमलदारांचा आढावा घेऊन त्यांना येत्या पाच दिवसांत मूळ बदली ठिकाणी हजर होण्याबाबत निर्देश द्यावेत. तसेच, भविष्यात असा प्रकार होऊ नये, याबाबतही विशेष खबरदारी घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.