घरफोड्या करणाऱ्या तीन सराईतांना अटक, तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील
३८.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात घरे फोडून ऐवज लंपास करणाऱ्या तीन तरूणांना अटक करण्यात आली. तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील उमळवाड, कुंभोज येथील आहेत. त्यांच्याकडून दोन्ही जिल्ह्यातील मिळून ७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून ३८.६४ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
तौफिक सिकंदर जमादार (वय ३१, रा. उमळवाड, ता. शिरोळ), समीर धोंडिबा मुलाणी (वय ३१, रा. कुंभोज, ता. हातकणंगले), दीपक पितांबर कांबळे (वय २७, रा. उमळवाड, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हरिपूर (ता. मिरज) येथे दि. ३ आगस्ट रोजी प्रशांत आडसूळ यांचा बंगला फोडून सुमारे ३० लाखांचे दागिने तसेच रोकड लंपास केली होती. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
पथकाला तिघेही संशयित दुचाकीवरून (एमएच ०९ ईएच ७११०) जुना हरिपूर रस्ता परिसरात दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने जुना हरिपूर रस्ता परिसरात सापळा रचला. तिघेही दुचाकीवरून तेथे आल्यानंतर पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने सापडले. त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हरिपूर येथे सहा महिन्यांपासून विविध घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. दागिने जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याकडील ५, संजयनगर येथील एक आणि शिरोळ पोलिस ठाण्याकडील एक असे सात गुन्हे उघडकीस आणण्यात आले. तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांना सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर लवटे, अरूण पाटील, अमर नरळे, प्रकाश पाटील, सूरज थोरात, करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.