वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना अटक
सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विविध वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या ११ बॅटऱ्या, एक दुचाकी असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.
आकाश यल्लाप्पा पवार (वय ३२, रा. माकडवाले गल्ली, सांगली), आकाश प्रकाश देवर्षी (वय ३२, रा. सोमवार बाजार, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सांगलीचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी विविध चोऱ्यांतील गुन्हेगारांना पकडण्याच्या सूचना विश्रामबागच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकातील बिरोबा नरळे यांना नेमीनाथनगर परिसरातून दोघेजण दुचाकीवरून बॅटऱ्या घेऊन जाताना दिसले. त्यांना संशय आल्याने त्यांच्यासह पथकाने दोघांना अडवले.
त्यांच्याकडे बॅटरी तसेच दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ट्रकसह विविध वाहनांतून बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. त्यांच्याकडून एक दुचाकी, चोरीच्या ११ बॅटऱ्या असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांनाही अटक करण्यात आली.
सांगलीचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाने विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे, उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, बिरोबा नरळे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, अमर मोहिते, संकेत कानडे, योगेश पाटील, शुभांगी पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.