Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जितक्या मतदारसंघांमध्ये होईल "सांगली"; तितकी सत्तेची समीकरणे डळमळती !!

जितक्या मतदारसंघांमध्ये होईल "सांगली"; तितकी सत्तेची समीकरणे डळमळती !!



पुणे : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक राजकीय वाक्प्रचार रूढ होत चालला आहे, तो म्हणजे हक्काची जागा खेचून नावडता उमेदवार दिला, तर "सांगली" करू !!, हा होय.

1960 च्या दशकानंतर संपूर्ण देशात आयाराम - गयाराम हा राजकीय वाक्प्रचार रूढ झाला होता. तो अजूनही राजकीय चलनी नाण्यांमध्ये आहे, पण आता तुम्ही वरच्या लेव्हलला काहीही तडजोडी करून मतदारसंघ खेचून नापसंत उमेदवार उभा करा, तिथे "सांगली" करू !! हा वाक्प्रचार रूढ होऊ लागला आहे.

कारण सांगलीत ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांनी काँग्रेसची "गेम" करायचा प्रयत्न केला, पण तो काँग्रेसच्याच नेत्यांनी छुप्या पद्धतीने उधळून लावला. त्यातून मतदारसंघाची "सांगली" करणे असा वाक्प्रचार रूढ झाला. वसंतदादा पाटलांच्या नातवाचा "गेम" करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे एक झाले. जिंकता आली, तर ठीकच अन्यथा भविष्यात एका लोकसभा मतदारसंघात आपला दावा उमेदवारीच्या निमित्ताने कायम राहतो असा विचार करून उद्धव ठाकरेंनी सांगली परस्पर महाविकास आघाडीतून खेचून घेतली. त्याला जयंत पाटलांनी हातभार लावला. कारण सांगलीत वसंतदादा पाटलांच्या घराण्याचा वर्चस्व कायमचे संपले, तर आपल्यालाच फायदा हा त्यांचा हिशोब होता.

काँग्रेस सुरुवातीला गाफील राहिल्यामुळे पक्षाच्या हातातून सांगली मतदारसंघ निसटला. पण उमेदवारी खेचून घेताना काँग्रेसच्या नेत्यांमधून नेत्यांची जी गाफिली झाली, ती त्यांनी वेळीच सावरली. काँग्रेसच्याच नेत्यांनी प्रचारात उतरून विशाल पाटलांचा विजय सुनिश्चित केला आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे विशाल पाटील जिंकले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा देऊन टाकला. उद्धव ठाकरेंची कधीच नसलेली सांगली त्यांच्या हातातून निसटली यात त्यांचा फारसा तोटा नाही झाला, पण जयंत पाटलांच्या एकूण राजकारणाला धक्का बसला. वसंतदादा पाटलांच्या घराण्याला कायमचा हादरा देण्याचा त्यांचा मनसूबा उधळला गेला.

आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घटक पक्षाने किंवा अगदी महायुतीतल्या कुठल्याही घटक पक्षाने आपला नसलेला मतदारसंघ खेचून घेतला आणि तिथे नापसंत उमेदवार दिला, तर "सांगली" करू असे इशारे, दमबाजी सुरू झाली आहे.

रोहित पवारांचा कर्जत जामखेड मतदारसंघात आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळ मतदारसंघात ही भाषा ऐकू आली आहे. रोहित पवारांनी कर्जत जामखेड मधून निघावे आणि बारामतीत पोहोचावे, नाहीतर इथे "सांगली" करू, असा इशारा काँग्रेसच्या तिथल्या दावेदारांनी दिला, तर मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही. आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देऊ नका, अन्यथा मावळात "सांगली" करू, असा महायुतीत इशारा दिला.

एकूण वरच्या लेव्हलवर तडजोडी करून महाराष्ट्रात जितक्या मतदारसंघांमध्ये नापसंत उमेदवार लादले जातील, तिथे "सांगली" होईल आणि जितक्या मतदारसंघांमध्ये "सांगली" होईल, तितक्या मतदारसंघांमध्ये परस्पर विरोधकांचे काटे काढून सत्तेची समीकरणे डळमळतील !! कारण लोकसभेच्या निकालाच्या आधारे जरी आज महाविकास आघाडीला एडव्हांटेज असला, तरी त्यांच्याच जागावाटपातून "सांगली"चा धोका उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.