सांगलीत डोक्यात कोयत्याने वार करून तरूणाचा निर्घ्रुण खून
हनुमान जयंतीला झालेल्या वादातून कृत्य, पाच अल्पवयीन ताब्यात
सांगली : खरा पंचनामा
शहरातील जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एका तरूणाचा कोयत्याने डोक्यात वार करून निघृणपणे खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. हनुमान जयंतीला झालेल्या वादातून पाचजणांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली.
अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय २२, रा. जामवाडी, सांगली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अनिकेत एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. जामवाडीतील एका सार्वजनिक मंडळातही तो सक्रीय होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या हनुमान जयंतीवेळी त्याचा मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. त्यातून त्याने एकाला कानाखाली मारली होती. त्याचा राग त्या मुलांना होता.
मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ थांबला होता. त्यावेळी संशयित अल्पवयीन मुले तेथे आली. त्यांनी पूर्वी झालेल्या वादाचा जाब त्याला विचारला. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर संशयित दोन मुलांनी अनिकेतवर दोन कोयत्यांनी सपासप वार केले. त्यातील वार वर्मी बसल्याने अनिकेत तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर संशयित मुले तेथून पसार झाली.
या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक जाधव, सांगली शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे, एलसीबीचे निरीक्षक सतिश शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी काही पथके संशयितांच्या शोधासाठी पाठवण्यात आले. पथकांनी केलेल्या चौकशीत हा खून पाच अल्पवयीन मुलांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत हनुमान जयंतीला झालेल्या वादातून अनिकेतचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिस त्यांच्याकडे कसून तपास करत आहेत. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.