डुप्लिकेट लायसन्ससाठी आरटीओकडून शुल्कवाढ
मुंबई : खरा पंचनामा
डुप्लिकेट वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काढण्यासाठी आता नागरिकांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्रीय परिवहन विभागाकडून ही शुल्क वाढ करण्यात आली असून, प्रत्येकी 400 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 258 रुपये शुल्क होते. नव्या दरानुसार आता 658 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. राज्यात दरवर्षी सरासरी दहा ते अकरा लाख नागरिक नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढतात. वाहनचालक लायसन्स हरवले, तुटले, खराब झाले, फोटो दिसेनासा झाला अशा विविध कारणांस्तव डुप्लिकेट लायसन्स काढतात. राज्यात दरवर्षी सरासरी दीड लाख नागरिक डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स काढतात. मात्र, आता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग परिवहन विभागाने डुप्लिकेट वाहन परवान्याचे (ड्रायव्हिंग लायसन्स) शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन विभागाने या निर्णयाची राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरला (एनआयसी) ऑनलाइन दर अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.
डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑगस्टपर्यंत 258 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, आता नागरिकांना डुप्लिकेट लायसन्ससाठी 400 रुपये जादा म्हणजेच 658 रुपये मोजावे लागणार आहेत. परिवहन विभागाच्या निर्णयानुसार नागरिकांना आता आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
परिवहन विभागाच्या आदेशानुसार शुल्क वाढ झालेली आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी आरटीओत नव्या दराची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, एकाचवेळी थेट 400 रुपयांची वाढ झाल्याने नागरिकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहेत. येत्या काळात इतर सेवा शुल्कदेखील वाढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.