मंडल अधिकारी, प्रांताधिकाऱ्यांसाठी ७ हजारांची लाच मागणाऱ्या महिला तलाठ्यावर गुन्हा
खासगी व्यक्तीचाही समावेश, सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
साताबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी मंडल अधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांसाठी म्हणून सात हजारांची लाच मागणाऱ्या येडेमच्छिंद्र येथील महिला तलाठ्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी सीमा विलास मंडले (वय ४४, रा. सैदापूर, ता. कराड), चंद्रकांत बबनराव सूयर्वंशी (वय ३३, रा. येडेमच्छिंद्र) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांनी शेत जमीन खरेदी केली आहे. त्याची नोंद सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी येडेमच्छिंद्र येथील तलाठी कायार्लयात अर्ज केला होता. त्यावेळी मंडले आणि सूर्यवंशी यांनी त्यांच्याकडे दहा हजार रूपयांची मागणी केली. त्याबाबत तक्रारदाराने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
ब्युरोने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंडले आणि सूर्यवंशी यांनी याबाबत मंडल अधिकारी श्रीमती जाधव यांच्याशी व्हाट्सएप कॉलवर चर्चा करून मंडल अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्यासाठी सात हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी मंडले आणि सूर्यवंशी यांच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, प्रितम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, पोपट पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.