निपाणी-देवगड राज्य महामार्गावर ट्रक आणि बोलेरोची भीषण धडक; 3 तरुण जागीच ठार, 4 जखमी
राधानगरी : खरा पंचनामा
निपाणी-देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी परिसरात ट्रक आणि बोलेरो गाडीच्या झालेल्या भीषण धडकेत बोलेरोतील तीन तरुण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातानंतर ट्रकसह घटनास्थळावरून पसार झालेला ट्रकचालक इस्पर्ली पोलीस चौकीत हजर झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली.
या भीषण अपघातात सोळांकुर, ता. राधानगरी गावातील शुभम चंद्रकांत धावरे (वय 28), आकाश आनंदा परीट (वय 23) आणि रोहन संभाजी लोहार (वय 24) या तीन युवकांचा मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ऐन गणेशोत्सवात या अपघातामुळे एकाच गावातील तिघा जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळ तसेच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वळणावर ट्रक (केए 28 एए 8206) ने बोलेरो (एम.एच. 42 एच 3064) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या धडकेत शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार हे जागीच ठार झाले. तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर राजेंद्र मनोहर लोहार (वय 41, रा. सोळांकुर) यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली. अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सुरवातीस अज्ञात ट्रक चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पण नंतर पुढे अपघात करणारा ट्रकचालक ट्रकसह इस्पुर्ली पोलीस चौकीत स्वतः हजर झाला असून त्याच्यावर बेदरकारपणे वाहन चालवू तिघांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याचा व चौघांना जखमी केल्याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.