अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण?
का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?
बदलापुर : खरा पंचनामा
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला काल एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलं. मुंब्रा बायपास येथे अक्षयने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून तीन राउंड फायर केले. यात मोरे जखमी झाले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर तो तावडीतून पळून जाऊ नये, म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून एक गोळी झाडली.
या एका गोळीतच अक्षय शिंदे ठार झाला. या एन्काउंटर प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून या प्रकरणातील अन्य आरोपींना वाचवण्यासाठीच हा एन्काउंटर घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशातच आरोपी अक्षय शिंदे याच्यावर गोळी झाडणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्याविषयी नवी माहिती समोर आली आहे.
अरुण टिकू हत्याकांडातील आरोपी विजय पालंडे याला पोलीस कस्टडीतून फरार होण्यास मदत केल्याचा आरोप झाल्याने पोलीस अधिकारी संजय शिंदे यांचं निलंबन झालं होतं. तसंच त्यांना सेवेतून बरखास्त करण्याचा प्रस्तावही पोलीस महानिरीक्षक कार्यालयाला पाठवण्यात आला होता. मात्र पोलीस महानिरीक्षकांना हा प्रस्ताव नाकारल्याने संजय शिंदे पुन्हा पोलीस विभागात कार्यरत झाले. हेच संजय शिंदे आता बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काउंटरमुळे चर्चेत आले आहेत.
दरम्यान, संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे. तसंच त्यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केलं आहे. तत्कालीन आयपीएस प्रदीप शर्मा त्याचे नेतृत्व करत होते. इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्येही संजय शिंदे यांचा समावेश होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.