फडणवीसांच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी सात पोलीस निलंबित ?
मुंबई : खरा पंचनामा
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनात येऊन मुंबईतील धनश्री सहस्त्रबुद्धे महिलेने घातलेल्या धुडगुसाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने सात पोलिसांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे. मंत्रालय प्रवेशासाठी आवश्यक असलेला प्रवेश पास न घेता या महिलेने मंत्रालयाच्या सचिव प्रवेशद्वारातून प्रवेश केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सात पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुरुवारी (ता. 26 सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक महिला फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात घुसली आणि बाहेर असलेल्या झाडांच्या कुंड्या फेकून देत आरडाओरड करू लागली. कुठलीही भीती न बाळगता या महिलेने फडणवीस यांच्या दालनावर असलेली त्यांच्या नावाची पाटीही काढून फेकून दिली. त्यानंतर संबंधित महिलेने तेथून पलायन केले.
फडणवीस यांच्या कार्यालयासमोरच मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे कार्यालय आहे. त्यांना ही घटना समजताच त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या दालनाबाहेर अनोळखी महिलेने घातलेल्या धुडगुसामुळे मंत्रालयातील पोलीस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सुजाता सौनिक यांनी या घटनेची दखल घेत शुक्रवारी पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर त्या महिलेच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरली. तपासादरम्यान मंत्रालयाचे सीसीटीव्ही फुटेलमध्ये या अज्ञात महिलेने सचिवांसाठी राखीव असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्याचे समोर आले. त्यावेळी तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने तिला हटकले नाही किंवा तिला कोणीही चौकशी केली नसल्याचे दिसले. त्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी या प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई अशा सात जणांचा समावेश असल्याचे समजते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.