नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे काढला काटा
एरंडोली खून प्रकरण; संशयिताला बारा तासात अटक
मिरज : खरा पंचनामा
एरंडोली येथील प्रमोद जाधव याचे नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध होते. मंगळवारी दुपारी प्रमोदसह ती महिला बोलत बसलेली दिसल्याने राग अनावर झाल्याने महिलेच्या नातेवाईकाने कुऱ्हाडीने प्रमोदवर सपासप वार करत त्याचा खून केला. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने हालचाली करत बारा तासाच्या आत संशयिताला अटक केली.
धोंडीराम लक्ष्मण माने (वय ४२, रा. माने वस्ती, एरंडोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मृत प्रमोद जाधव आणि संशयित माने याच्या नातेवाईक महिलेचे बऱ्याच दिवसांपासून अनैतिक संबंध आहेत. मंगळवारी दुपारी प्रमोद जनावरे चरण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी ती महिलाही तेथे गेली होती. शेतातील एका बांधाखाली प्रमोद आणि ती महिला बोलत बसली होती. त्यावेळी संशयित धोंडीराम माने तेथे आला. दोघांनाही बोलत बसलेले पाहून त्याला राग अनावर झाला.
धोंडीराम माने याने हातातील कुऱ्हाडीने प्रमोदवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. महिलेच्या समोरच त्याने प्रमोदच्या छातीवर, मानेवर, हातावर वर्मी घाव बसले. त्यानंतर धोंडीराम तसेच ती महिला तेथून निघून गेले. सायंकाळपर्यंत प्रमोद घरी न आल्याने त्याचा भाऊ प्रवीण जाधव त्याचा शोध घेत होता. त्यावेळी शेताकडेला असलेल्या झुडुपात रक्ताच्या थारोळ्यात प्रमोदचा मृतदेह त्याला दिसला. याबाबत प्रवीण जाधव याने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत माहिती घेतल्यानंतर मृत प्रमोदचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी संशयित धोंडीराम माने याला अटक केली.
मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक पांडुरंग मुंढे, दीपक माने, मुलुकचंद नदाफ, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन मोरे, सचिन पवार, अजित देसाई, अनिल खोत, वर्षा फराटे, प्रियांका माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.