पाण्यातील मोटर चोरणाऱ्या कर्नाटकातील एकाला अटक
१.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्यातील विविध ठिकाणांहून पाण्यातील मोटर चोरणाऱ्या कर्नाटकातील एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणत १.८८ लाखांच्या १४ मोटारी, रोकड, मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
योगेश इश्वर पाटील (वय ४०, रा. अनंतपूर, जि. बेळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जत तालुक्यातील शेगाव येथील नितीन पट्टणशेट्टी यांच्या शेतातील मोटर दि. १७ सप्टेंबर रोजी चोरीला गेली होती. याबाबत जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयितांना शोधण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
पथक भोसे येथील सामाजिक वनीकरण परिसरात चोरट्यांचा शोध घेत असताना तेथे एक मोपेड दिसून आली. तेथील झाडीमध्ये लपलेल्या पाटील याला संशयास्पद हालचालीमुळे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने विविध ठिकाणांहून पाण्याच्या मोटर चोरल्याची कबुली दिली. तसेच त्या लपवून ठेवलेले ठिकाणही दाखवले. तेथून त्याने चोरलेल्या १४ मोटारी जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडील रोकड तसेच मोपेडही जप्त करण्यात आली. त्याला जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, सतिश माने, अरूण पाटील, अमोल ऐदाळे, सूरज थोरात, विनयाक सुतार, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.