देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक
सांगली बसस्थानकाजवळील शास्त्री उद्यानाजवळ एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असलेल्या शास्त्री उद्यानाजवळ येथे बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल, दोन काडतूस असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
रविंद्रनाथ उर्फ अमोल काशीनाथ जाधव (वय ३१, रा. डफळापूर, ता. जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक तयार केले होते. पथक शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेत असताना सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असलेल्या लालबहादूर शास्त्री उद्यानाजवळ जाधव देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने त्या परिसरात सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या पॅंटच्या खिशात मॅगझीनसह देशी बनावटीचे पिस्तूल तसेच दोन काडतूस आढळले. शस्त्र बाळगण्याचा परवाना नसतानाही त्याने ते बाळगल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले तसेच त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक कुमार पाटील, मच्छिंद्र बर्डे, विनायक सुतार, संकेत कानडे, ऋतुराज होळकर, नागेश कांबळे, सूरज थोरात, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.