जिल्हा परिषद शाळेत चक्क "झिरो शिक्षक"!
शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीत उघड झाला प्रकार
सांगली : खरा पंचनामा
नागरिकांना "झिरो पोलिस", "झिरो वायरमन" असे विविध शासकीय कार्यालयातील "झिरो" माहिती आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात एक नवीन "झिरो" सापडला आहे. छत्रपतींचे नगर असलेल्या एका जिल्हा परिषद शाळेत "झिरो शिक्षक" कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीत हा प्रकार उघडकीस आला असून त्यांनी शेऱ्यातही याचा उल्लेख केला आहे.
शिक्षकांच्या एका संघटनेचा नेता असलेला शिक्षक छत्रपतींचे नगर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत नेमणुकीस आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी परीक्षा कालावधीत या शाळेला अचानक भेट दिली. त्यावेळी संबंधित शिक्षकाऐवजी एक महिला मुलांना अध्यापन करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट मुलांनाच त्यांच्या शिक्षकांबद्दलची माहिती विचारली.
त्यावेळी या शाळेतील निरागस मुलांनी खरी खरी उत्तरे दिली. संबंधित शिक्षक केव्हातरी शाळेत येतात. सध्या ज्या महिला शिकवत आहेत, त्याच आम्हाला शिकवतात असे सांगितले. त्यानंतर साहेबांनी संबंधित शिक्षक नेत्याला बोलावणे धाडले. साहेबांनी सांगावा धाडूनही तो शिक्षक नेता दोन तासांनी शाळेत प्रकटला. या प्रकाराने संतप्त झालेल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकाबद्दलचा उल्लेख शेऱ्यामध्ये केला आहे. दरम्यान या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून संबंधित शिक्षक नेता हे वृत्त दाबण्यासाठी सक्रिय झाल्याचीही चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.