कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापूर : खरा पंचनामा
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना कोल्हापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संताजी घोरपडे हे रविवारी रात्री प्रचार संपवून आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापूरकडे परतत होते. त्यावेळी मनवाड येथे सहा ते सात लोकांनी त्यांची गाडी थांबवली. जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला भेटायला थांबले असतील, असे सुरुवातीला संताजी घोरपडे यांना वाटले. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांसह या लोकांची विचारपूस करण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यावेळी बाहेरील लोकांनी काठ्या आणि भाल्यासह संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला चढवला.
संताजी घोरपडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून आणि हातामधून रक्त वाहत होते. मारेकऱ्यांचा हल्ला संताजी घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसाबसा परतावून लावला. त्यानंतर हल्लेखोर रस्त्यालगत असणाऱ्या शेतात पळून गेले. जाताना त्यांनी संताजी घोरपडे यांच्या गाडीवरही दगडफेक केली.
यानंतर संताजी घोरपडे आणि त्यांचे सहकारी कोल्हापूरमध्ये परतले. यानंतर संताजी घोरपडे यांच्या डोक्यातून आणि हातातून रक्त वाहत असतानाचे फोटो कोल्हापूरमध्ये व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी कळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.