चोरीच्या गुन्ह्यात ३६ वर्षे फरार असणाऱ्या कोल्हापूरच्या एकास अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
तब्बल ३६ वर्षापूर्वी कामेरी येथे केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या सांगवडे (जि. कोल्हापूर) येथील गुन्हेगाराला अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
सुनील विश्वास जिरगे (वय ५८, रा. सांगवडे, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संशयित जिरगे हा १९८८ मध्ये वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मजुरी करत होता. सप्टेंबर १९८८ मध्ये कामेरी येथील रविंद्र जाधव यांच्या घरातून रोकड आणि चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरारी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक पथक तयार केले होते.
गुन्हेगारांचा शोध घेत असताना संशयित जिरगे सांगली बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला होता. तो बसस्थानक परिसरात आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने कामेरीतील चोरीची कबुली दिली. त्याला अटक करून इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक अफरोज पठाण, संदीप गुरव, अरूण पाटील, सतीश माने, रोहन घस्ते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.