'मुख्यमंत्रीपदी फडणवीस' विधानावरुन अमित शाहांचे घुमजाव
मुंबई : खरा पंचनामा
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी चारच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिले होते. अमित शाह यांच्या विधानानंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील अशी चर्चा सूरू झाली होती. मात्र या विधानाच्या दोनच दिवसानंतर अमित शाह यांनी सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ठरवतील, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे अमित शहांच्या यांच्या संकेतामागे आणि विधानामागे नेमका अर्थ काय आहे? आणि अमित शाह नेमकी कोणती खेळी करतायत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खरं तर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी तीनही पक्षाचे नेते उत्सुक आहेत. त्यात अजित पवारांचे नेते आणि कार्यकर्ते वेळोवेळी बॅनरबाजी करून अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत असतात. अजित पवारांनी देखील अनेकदा व्यासपीठावरून मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच शिंदे गटाकडून देखील अनेकदा उठाव केल्याची आणि बलिदान दिल्याची आठवण काढत शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे यासाठी नेत्यांनी जोरदार मागणी केली आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाबद्दल बोलायचं झालं तर भापज 148 जागा लढणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना 85 जागा लढणार आहे. आणि सर्वात कमी म्हणजेच 51 जागा या अजित पवारांची राष्ट्रवादी लढणार आहेत. त्यामुळे वाट्याला जरी कमी जागा आल्या तरी शिंदे, पवार या दोन्ही गटाची मुख्यमंत्री पद मिळावं अशी अपेक्षा नक्कीच आहे.
त्यामुळे तीनही पक्षातील मुख्य नेते मुख्यमंत्री पद उपभोगण्याची स्वप्न बघत असताना अमित शहा यांनी मुंबईतल्या एका सभेत महायुतीला विजयी करा, फडणवीसांना विजयी करा, असे विधान केले होते. या विधानातून अमित शहा यांनी फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील अशी चर्चा सूरू झाली होती. पण अमित शहा यांच्या विधानानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या कुठल्याही चढाओढीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान अमित शहांच्या फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या संकेतानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटात नाराजी पसरण्याची शक्यता होती. इतकंच नाही तर निवडणुकीआधी महायुतीत मिठाचा खडा पडण्याची दाट शक्यता आहे. याचा परिणाम महायुतीच्या प्रचारावर आणि निवडणुकीवर होण्याचाही अंदाज होता. त्यामुळे या विधानाच्या दोनच दिवसानंतर अमित शहा यांनी महाराष्ट्रात महायुती सरकार आहे. या सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होतील? हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ठरवतील. त्यामुळे अमित शाह यांनी हे विधान करून निवडणुकीआधी संभाव्य धोका टाळल्याची चर्चा आहे.
असं असलं तरी अमित शहा यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांचच नाव आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती तोडून राष्ट्रवादी- काँग्रेस सोबत सरकार स्थापण केलं होतं. त्यावेळेस फडणवीसांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा केली होती. ही घोषणा त्यावेळेस खुप चर्चेत आली होती. त्यानंतर कोविड नंतर उद्धव ठाकरेंच सरकार पडलं आणि शिंदे- फडणवीसांच सरकार आलं होतं. पण त्यावेळेस दिल्लीतून शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.