Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन, CID तपास करणार बीडमधील सरपंच हत्या प्रकरण

दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन, CID तपास करणार
बीडमधील सरपंच हत्या प्रकरण



बीड : खरा पंचनामा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही कारवाई केली आहे.

पोलीस अधिक्षकांनी पीएसआय राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर पीआय प्राशांत महाजन यांच्या निलंबनासाठी शासनाकडे अहवाल सादर केला आहे. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर कर्तव्यावर कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी मान्य करण्यात आली आहे. तसेच विशेष सरकारी वकिलांची मागणीदेखील मान्य करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी 2 पथके रवाना झाल्याची माहितीदेखील पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज सकाळी 9 वाजेपासून केजमध्ये लातूर-बीड मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनात लहान मुलं, महिला, बालकं, पुरुष मंडळी, वृद्ध असे शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. दुपारनंतर या आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागलं होतं. आंदोलकांनी एसटी बसची जाळपोळ केली होती. तसेच पोलीस आणि आंदोलक आमनेसामनेदेखील आल्याची घटना घडली होती. यानंतर घटनास्थळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील दाखल झाले होते.

मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांची भेट घेत घटनेची माहिती घेतली होती. त्यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. मनोज जरांगे यांनी पोलीस अधीक्षकांकडे ग्रामस्थांच्या मागण्या ठेवल्या. पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर तब्बल 11 तासांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपलं रास्ता रोको आंदोलन स्थगित केलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.