जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलाचे बळकटीकरण करणार
पालकमंत्री चंद्रकांत पाटील : सांगलीत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सांगली : खरा पंचनामा
जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलाचे बळकटीकरण करण्यात येत आहे. प्राधान्य कुटुंब योजना, अंत्योदय योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना प्रभावीपणे राबवण्यात आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवित आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्य शासन वाटचाल करीत आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तद्नंतर सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले गेले व 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणले गेले. भारतीय संविधान मार्गदर्शनीय आणि वंदनीय आहे. सर्व शैक्षणिक संस्था व शासकीय, निमशासकीय कार्यालयात सन्मानपूर्वक संविधान प्रत ठेवावी, असे त्यांनी सूचित केले.
सांगली जिल्ह्यात पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली आहे. पोलीस विभागास अंमली पदार्थांबाबत खात्रीशीर, ठोस आणि अचूक माहिती देणाऱ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला मिळणाऱ्या वेतनातून वैयक्तिकरीत्या रक्कम रूपये 10 हजारचे बक्षीस यावेळी जाहीर केले.
जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून भरीव तरतूद केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून अनेक नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख कामे हाती घेतली आहेत, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी सात कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवावा, यामुळे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होईल, असे ते म्हणाले.
अनेक सांगलीकरांनी जिल्ह्याची शान वाढवली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) प्राप्त मुरलीकांत पेटकर, अर्जुन पुरस्कारप्राप्त पॅराॲथलिट सचिन खिलारी, आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आलेली स्मृती मानधना, अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि सुनील फुलारी, राष्ट्रपती पोलीस पदकप्राप्त राष्ट्रीय तपास संस्था, मुंबईचे संपर्क अधिकारी अमोल हाके, राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक विजेती विश्वसम्राज्ञी माने यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस दलातील इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हवालदार नितीन बराले, हवालदार अहमद मणेर, हवालदार तुळशीराम गोरवे, पोलीस नाईक सलमा इनामदार यांचा गौरव करण्यात आला.
ॲग्रीस्टॅक योजनेंअंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना प्रमाणपत्र व सातबारा वाटपही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान-2025 निमित्त प्रातिनिधीक स्वरूपात हेल्मेट वाटप व रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. संविधान अमृत महोत्सव सन 2024-2025 हर घर संविधान या अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भारतीय संविधानाची प्रस्ताविका भेट दिली. यावेळी विविध पथक प्रमुखांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मानवंदना दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्निशमन दल, शाळांचे पथक, पोलीस दल बँड पथक, दंगल विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदि पथकांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक नीता कट्टे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.