राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती ? अजित पवार नाराज...
मुंबई : खरा पंचनामा
महायुतीमध्ये सगळ काही छान असल्याचे मंत्री आणि पक्षातील तिन्ही प्रमुख सांगत असतात. मात्र महायुतीत सध्या कुरघोड्यांना उत आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्याच्या निर्णयाला परस्पर स्थगिती दिल्याचे आता समोर आले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरून सध्या उलट सुलट चर्चांना वाव मिळत आहे.
आज (ता. 15) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर असून ते महायुतीच्या मंत्र्यासह आमदारांची भेट घेणार आहेत. याच दरम्यान बीड आणि परभणी प्रकरणावर ते सरकारला कोणत्या सूचना करतात हे पाहावं लागणार आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणता निर्णय घेतला जातो याकडे देखील राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान महायुतीतील कुरघोडी उघड झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीतच यावर चर्चा झाल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील यांचे निर्णय परस्पर मुख्यमंत्र्यांनी थांबवले आहेत. त्यांच्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचा पदभार आहे. तर मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी आहे.
या दोघांनी आपल्या विभागाच्या बाबत घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने पक्षाच्या बैठकीत नाराजी उमटली. यानंतर बैठकीत अजित पवार यांनी यावरून नाराजी व्यक्त केल्याचे कळत आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी किमान निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्याशी चर्चा करायला हवी होती, असे म्हटले आहे.
यावेळी अजित पवार यांनी, महायुती म्हणून तिन्ही पक्ष काम करत आहेत. यामुळे कुठेतरी समन्वय असायला हवा. चर्चा व्हायला हवी अशी आपली इच्छा असल्याचे बोलून दाखवले. तर भविष्यात महायुती म्हणून वाटचाल करायची असेल तर पक्ष प्रमुखांशी आधी बोलावे असाही सल्ला दिला आहे. तर मंत्र्यांचे निर्णयांना स्थगिती देण्याआधी चर्चा करूनच तसे निर्णय घ्यावेत असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.