संजय शिरसाट यांची 'सिडको'च्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी
मुंबई : खरा पंचनामा
मंत्रीपदी असतानाही 'सिडको'च्या अध्यक्षपदी ठाण मांडून बसलेले शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांची अखेर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली.
महायुती सरकारच्या काळात मंत्रीपदाने हुलकावणी दिलेल्या संजय शिरसाट यांची नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लावली होती. आता महायुती सरकारमध्ये शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे खाते सोपविण्यात आले आहे. नियम आणि संकेतानुसार मंत्रीपदी विराजमान झालेल्या व्यक्तीने मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित असतानाही शिरसाट मात्र गेले महिनाभराहून अधिक काळापासून दोन्ही पदावर कार्यरत आहेत.
शिरसाट यांची मंत्रीपदी निवड झाल्याने त्यांच्याकडे सोपविण्यात आलेला सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आणण्यात आल्याचे नगरविकास विभागाने एका आदेशान्वये जाहीर केले आहे.
पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेत एक व्यक्ती, एक पद हे सूत्र राबविले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये जाहीर केले असले तरी शिरसाट मात्र गेला महिनाभर अध्यक्षपदावर ठाण मांडून बसले होते. एवढेच नव्हे तर संचालक मंडळाच्या बैठका घेत निर्णयांचा धडाका लावला होता. एकच व्यक्ती दोन पदावर राहणे, लाभाचे पद उपभोगणे याबाबत पक्षातूनच उपमुख्यमंत्री शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर शिरसाट यांना अध्यक्षपदावरून त्वरित दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागास दिले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.